Crops Damage | निफाडमध्ये हाता तोंडाशी आलेल्या टोमॅटो पिकाचे माथेफिरूकडून नुकसान; शेतकरी हवालदिल


Crops Damage | मोठ्या प्रतीक्षेनंतर टोमॅटोला 800 रु. प्रतिक्रेट दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असतानाच, निफाड तालुक्यातील मुखेड येथे शनिवारी 28 तारखेच्या मध्यरात्री एका माथेफिरूने दहा शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या टोमॅटोच्या पिकांवर विळा, कोयत्याने वार करून नासधूस केली. सध्या मिळत असलेला टोमॅटोचा भाव व झालेले नुकसान पाहतात तीन लाखांकून अधिक आर्थिक नुकसान यामध्ये झाले आहे. तर माथेफिरूच्या या कृत्यामुळे आता शेतकऱ्यांवर शेतमालाची रात्रीच्या वेळी राखण करण्याची वेळ आली आहे.

Agro News | केळीच्या दरात घसरण कायम

यंदा टोमॅटोला चांगला दर पण..

जवळजवळ तीन वर्षानंतर टोमॅटो उत्पादकांना सरासरी 800 रुपये क्रेट असा दर मिळत आहे. परंतु टोमॅटोला मिळणाऱ्या या दराला विकृत मनोवृत्तीची दृष्ट लागली. निफाड तालुक्यातील मुखेड येथील शेतकरी निर्यातक्षम टोमॅटो उत्पादनात आघाडीवर असतात, त्यासाठी अधिकचा खर्च देखील करतात. यंदा देखील मोठ्या प्रमाणात मुखेड परिसरात टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. सध्या काढणीचे काम सुरू असून दरात सुधारणा असल्याने कष्टाचे चीज झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती.

परंतु, शनिवारची मध्यरात्री मुखेडच्या 10 शेतकऱ्यांच्या पिकासाठी वैरी ठरली. एका माथेफिरूकडून मुखेडच्या पिंपळगाव रस्त्यावरील एमआयडीसी लगत असलेल्या टोमॅटोच्या बागेचे विळा आणि कोयत्या सारख्या धारदार हत्याराचा वापर करून शेतातील दोन गल्ल्यांमधील टोमॅटो पिकांवर वार केल्याची घटना घडली. यामध्ये तब्बल वीस गल्ल्यांमध्ये त्या माथेफिरूने धुडगूस घातला. शेतात टोमॅटो विखुरलेले होते. तर काही झाडे उखडून टाकली होती. परशुराम पवार यांच्या भोपळ्याच्या पिकाचीही यामध्ये नासाडी झाली. संबंधित शेतकऱ्याने सकाळी टोमॅटोच्या काढणीसाठी प्रवेश केला असता त्याला हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्व अनावर झाले. मल्चिंग पेपर, खते, बियाण्यांचा खर्च, तीन महिने कीटकनाशक फवारणी यासह काबाडकष्ट करून फुलवलेल्या टोमॅटोच्या पिकाची नासाडी झाली असून शेतकऱ्यांचे एकूण तीन लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

Agro News | पावसामुळे खंड पडल्यानंतर आता नवरात्रीमध्ये द्राक्ष काढणी जोर धरणार

नुकसान ग्रस्त शेतकरी

दत्तात्रय राजाराम पवार, शरद पोपटराव शेळके, देवदत्त भास्कर शेळके, परसराम राजाराम पवार, शरद श्रीराम शेळके, बाळासाहेब निवृत्ती पवार, निखिल विश्वनाथ जाधव, नामदेव कारभारी शेळके, कैलास संपतराव सताळे, प्रतापराव महादू पवार या शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. (Crops Damage)