Budget 2024 | नुकतंच देशात लोकसभा निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. यातच भारतात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार असून यंदा सार्वत्रिक निवडणुकांचे वर्ष असल्याने अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात आणखी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता असून जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आयुष्मान भारतचे विमा संरक्षण दुप्पट होण्याची शक्यता आहे.
भारतातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयुष्मान योजनेतील विमा संरक्षण सरकार दुप्पट करण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात असून असे झाल्यास देशातील १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होऊ शकतो. 2018 पासून आत्तापर्यंत 6.2 कोटी लोकांना या योजनेंतर्गत उपचार दिले गेले आहेत आणि 1.25 लाख कोटींहून अधिक रुपयांची बचतही झाली आहे.
Budget 2024 | अर्थ मंत्रालयात या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचे काम सुरू
सरकार आपल्या प्रमुख आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करून 10 लाख रुपये करण्याचा विचार करत असून अधिकृत सूत्रांच्या माहीतीनुसार, अर्थ मंत्रालयात या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत कॅन्सर आणि प्रत्यारोपणासारख्या गंभीर आजारांवर होणारा जास्त खर्चही कवचाखाली येऊ शकणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी मध्यंतरी केंद्रीय अर्थसंकल्पात त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Budget 2024 | या योजनेच्या लाभार्थी कुटुंबांची संख्या 12 कोटींच्या पुढे
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार, देशभरातील आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी कुटुंबांची संख्या 12 कोटींच्या पुढे गेली असून 30 कोटी लोकांची आयुष्मान कार्ड ही तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, 2018 पासून 6.2 कोटींहून अधिक लोकांना देशातील रुग्णालयात दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशाप्रकारे, आयुष्मान योजनेद्वारे गरीब आणि वंचित कुटुंबांच्या खिशातून 1.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचविण्यात सरकारला यश आलं आहे.