Silk Production | आरक्षणासाठी बीडमध्ये बंदची हाक; रेशीम उत्पादकांना फटका


Silk Production | सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत असून पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात शनिवार दिनांक 21 रोजी बंदची हाक दिली. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहारांसह बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली. परिणामी बाजार समितीत शनिवारी होणारे रेशमी कोषचे व्यवहार थांबले.

Agro News | खानदेशात पावसामुळे पीकहानी थांबेना; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज एकवटला आहे. बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली असून बाजार समितीत होणारी रेशीम कोष खरेदी देखील थांबली आहे. त्यामुळे अनेक रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी या बंदसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत व मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी देखील केली आहे.

रेशीम कोष खरेदीसाठी बीड केंद्रबिंदू

राज्यामध्ये रेशीम कोष खरेदीसाठी बीड बाजार समिती महत्त्वाची मानली जाते. येथे दहा ते बारा टन रेशीम कोष खरेदीसाठी येत असतो. शेतकरी पुणे, बीड, बारामती, इंदापूर, नाशिक, जळगाव, जालना, नगर, परभणी जिल्ह्यातील रेशीम कोष येथून आणतात पण शनिवारी बाजार समितीच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढलेले रेशीम कोष शेतावरच अडकले. बीड उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषची आवक चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथे चांगला दर मिळतो. सामान्य दर असल्यास कमीत कमी 50 ते 55 लाख रुपयांची उलाढाल होत असते. तर दरात चढ असल्यास किमान 1 कोटींपर्यंत उलाढाल होत असते. अशी माहिती बीड बाजार समितीतील संचालक धनंजय गुदेकर यांनी दिली. पण शनिवारी होणारे व्यवहारच थांबले आणि रविवारी सुट्टी असल्याकारणाने रेशीम कोष उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे नुकसान टाळण्यासाठी रविवारी बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती गुदेकरांनी दिली.

Agro News | केळीच्या आवकीत घट; सणासुदीमुळे उठाव कायम

रविवारी पुणे परभणी जालना बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत बीड, धाराशिव जिल्ह्यात शनिवारी बंद पुकारण्यात आला. त्यानंतर आता रविवारी दिनांक 22 रोजी पुणे, परभणी आणि जालना जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. (Silk Production)