Weather Update | उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह आणि बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ यामुळे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला.
Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; तापमानाचा पारा 10 अंशाखाली
धुळे आणि निफाड येथे नीचांकी तापमानाची नोंद
देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडी वाढली असून बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी देशाच्या सपाट भुभागावर पंजाब मधील ‘अदमपूर’ येथे नीचांकी 6.6 अंश तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 8.3 अंश तापमानाची नोंद झाली. तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पुणे व अहिल्यानगर येथे 9 अंशापेक्षा कमी तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर उर्वरित राज्यात देखील किमान तापमानाचा पारा घसरता होता.
राज्यात किमान तापमानातील घट कायम
राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढताच अनेक ठिकाणी कमाल तापमानातही घट होऊ लागली असून पारा 30 अंशाच्या खाली आला आहे. बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 33.4 अंश तापमान नोंदविले गेले. तर आज दिनांक 28 नोव्हेंबर व उद्या दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे येथे थंडीची लाट येणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमानात आणखीन घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
Weather Update | राज्यात कमाल तापमानात घट; परभणीत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद
आज बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा अंदाज
हिंद महासागरातील विषुवृत्तीय भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढून मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी वादळी प्रणालीची निर्मिती झाली आहे. तर बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी ही प्रणाली पुद्दुचेरी पासून 470 किलोमीटर चेन्नई पासून 550 किलोमीटर आग्नेयकडे होती. तर आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता असून हे चक्रीवादळ उद्यापर्यंत तमिळनाडू व श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत धडकण्याचा अंदाज आहे. (Weather Update)