Weather News | राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून उन्हाच्या कडाक्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा कायम आहे.
Weather Update | आज राज्यात पावसाचा जोर वाढणार
तापमानाचा पारा घसरला
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका वाढल्यामुळे कमाल तापमान 36 अंशांच्या पार गेले होते. परंतु मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली असून पारा 35 अंशाच्या खाली आला आहे. तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोल्यामध्ये राज्यातील उच्चांकी 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यामध्ये तापमानात घट झालेली पाहायला मिळाली.
पावसाचा येलो अलर्ट कायम
तर आज कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राने तयार झालेल्या पोषक हवामानामुळे वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये उन्हाचा चटका कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
कमी दाबाचे तीव्र क्षेत्र
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेला सरकले असून कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. वायव्येकडे जाताना या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता असून त्याला लागून समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून कर्नाटक तमिळनाडू ते बंगालचे उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
Weather Update | राज्यातील काही भागात दोन-तीन पावसाचा मुक्काम
‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा
रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून ठाणे, मुंबई, पालघर, जळगाव, धुळे, नगर, सांगली, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather News)