Weather Forecast | राज्याच्या किमान तापमानाचा पारा वेगाने खाली घसरत असून अनेक ठिकाणी पारा 17 अंशाच्या खाली घसरला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 11 अंशापर्यंत घसरल्याने थंडीची चाहूल लागली असून कोकणात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी ढगाळ हवामान, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Weather Forecast | आज राज्यात विजांसह पावसाचा इशारा!; तापमानात चढ-उतार कायम
राज्याच्या किमान तापमानात घट कायम
दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरले असून या भागात समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राजाच्या कमाल तापमानात हळूहळू घट व्हायला लागली असून कोकणात कमाल तापमान अजूनही 35 अंशाच्या पुढे आहे. बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी डहाणू येथे राज्यातील उच्चांकी 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी 11.86 तापमानाची नोंद झाली असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही किमान तापमान 15 अंशाच्या खाली घसरले आहे.
आज ‘या’ भागात पावसाचा इशारा
आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम राहणार असून दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे, रायगड, धाराशिव, सोलापूर, लातूर या जिल्ह्यात तुरळ ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast)