Onion News | अफगाणिस्तान नंतर आता तुर्की आणि इजिप्त मधून 120 टन कांद्याची आयात


Onion News | कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीस परवानगी दिल्यामुळे अफगाणिस्तान पाठोपाठ आता इजिप्त व तुर्की मधूनही 120 टन कांदा दाखल झाला आहे. हा कांदा पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये पाठवला जाणार असल्यामुळे ग्राहकांना कमी दरात मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध राहील असा दावा केला जात आहे.

Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक; आगामी काळात दरात सुधारणा होण्याची शक्यता

प्रदेशातून आलेल्या कांद्यामुळे स्थानिक कांद्याचे भाव पडणार

नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सरकार कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्याकरिता सातत्याने प्रयत्न करीत असते. परंतु आता सरकारने इजिप्त व तुर्की येथे मुंबई पुण्यासह मेट्रोसिटीत कांदा आणल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पडणार असल्याची शक्यता व्यापारी प्रवीण कदम यांनी वर्तवली आहे.

अफगाणिस्तान पाठोपाठ इजिप्त आणि तुर्कीतूनही कांद्याची आयात

केंद्राच्या वाणिज्य मंत्रालय व ग्राहक संरक्षण विभागाकडून कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. हा कांदा मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, चेन्नई, भुवनेश्वर या शहरांसह इतर मेट्रोसिटी मध्ये 30 ते 35 रुपये किलो प्रमाणे विक्री केंद्रांवर विकला गेला होता. मात्र, दर नियंत्रणात येत नसल्यामुळे आता केंद्राने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली असून मागील महिन्यात 24 सप्टेंबरला अफगाणिस्तानातून पंजाब राज्यातील अमृतसर जालिंदर या शहरांमध्ये 11 मालट्रकमधून 300 टन कांदा दाखल झाला होता. आता पुन्हा इजिप्त व तुर्की या देशातून 120 टन कांदा दाखल झाला आहे. (Onion News)

Onion News | फार्मर प्रोड्युसिंग कंपनी मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीकरीता रवाना

“कांदा निर्यातीस चालना देण्या ऐवजी केंद्राकडून कांदा आयात धोरण राबवून भाव स्थिर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही.” – प्रवीण कदम, कांदा व्यापारी, लासलगाव

“दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवला असून ढगाळ वातावरण व पावसामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात उत्पादन खर्चही वाढला आहे. आता सरकारने लोकसभा निवडणुकीप्रमाणे, विधानसभेला ही परदेशातून कांदा आयात केल्यामुळे भाव स्थिर राहतील मात्र शेतकऱ्यांना याचा कोणताही लाभ होणार नाही.” – निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष, शेतकरी बचतगट

“बऱ्याच प्रतीक्षेनंतर कांद्याला आता कुठेतरी चांगला दर मिळत आहे. त्यात केंद्राने तुर्की आणि इजिप्त मधून कांदा आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच केंद्राकडून निर्यातीसाठी 20% शुल्क घेणेदेखील अद्याप सुरूच आहे.” – भारत दिघोळे, अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक संघटना