Grape Damage | परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात द्राक्ष उत्पादक पट्ट्याला या अवकाळीचा मोठा फटका बसला असून नाशिक, सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्षांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव आहे. तर घड कमी व कमकुवत निघण्यासह गोळी घड, जिरणे, कोवळ्या फुटींचे नुकसान झाले आहे. यामुळे परिणामी द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
डाऊनी, करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव
द्राक्ष बागायतदार संघाच्या माहितीप्रमाणे, राज्यात साडेचार लाख हेक्टर वर द्राक्ष लागवड केली आहे. या वार्षिक फळ पिकाच्या उत्पादनासाठी गोडी बहार छाटणी कामकाजाला वेग आला असून द्राक्ष उत्पादक पट्ट्यात 50 टक्के छाटणी पूर्ण झाली आहे. परंतु परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांची हानी झाली असून छाटणी झालेल्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत. त्यात वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष वेलींवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला असून सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे वेलींची कार्यक्षमता मंदावली आहे. परिणामी घडाची अपेक्षित वाढ होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या पावसामुळे प्रामुख्याने घड जिरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
पीक संरक्षणासाठी अधिक खर्च
मागच्या महिन्याच्या मध्यापासून छाटण्या सुरू झाल्या होत्या परंतु, नुकसान वाढत असल्याने बागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असून डाऊनी, करपा यांसारख्या रोगांसह नाशिक भागात उघडा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असल्याने पीक संरक्षणासाठी औषधांच्या फवारण्या सुरू आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात पीक संरक्षण खर्च अधिक होत असून एकरी 5 ते 10 टक्क्यानुसार, एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर या पावसामुळे आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून सध्याच्या परिस्थितीमुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Grape Farming |पावसाने झालेल्या चिखलामुळे नाशकात द्राक्षबागांतील कामांमध्ये व्यत्यय
शेतकऱ्यांची धाकधूक वाढली
नाशिक विभागात चांदवड निफाड दिंडोरी सिन्नर तालुक्यांमध्ये जवळपास 50 टक्क्यांवर छाटणी पूर्ण झाली असून चांदवड दिंडोरी व निफाड तालुक्यांमध्ये मध्यवर्ती भागात मोठा फटका बसला आहे. मागील 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परंतु रोग किडींनी डोके वर काढले आहे. परतीच्या पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कळवले आहे. तर मागील उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी बागा जगवल्या परंतु पाऊस व उघडीपी नंतर पडणाऱ्या दवामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. (Grape Damage)