Agro News | ऐन सणासुदीला नाशकात अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांवर दुबार रोपनिर्मितीची वेळ


Agro News | दिवाळी सण तोंडावर असताना शेतकऱ्यांची सुगीची लगबग सुरू होती. त्यातच अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेल्याची स्थिती सटाणा, मालेगाव तालुक्यात दिसून येत आहे. सोंगलेली मक्याची कणसे पाण्यावर तरंगत असून, लेट खरीप कांदा लागवड व रब्बी कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. या आसमानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर सणासुदीला अतिवृष्टीमुळे पिकांची दैना झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. खरिपाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव, सटाणा तालुक्यांमध्ये शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Agro News | सणांमुळे झेंडूच्या दरात वाढ

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

या पावसाने सर्वाधिक नुकसान मका, लेट खरीप कांदा, कांदा रोपवाटिका, सोयाबीनचे झाले असून, काही ठिकाणी कांदा रोपे वाहून गेलीत, तर कांदा लागवड पाण्याखाली गेली आहे. तर कुठे मक्याची कणसे पाण्यात तरंगत असल्याचे चित्र आहे. पिके काढणीच्या अवस्थेत असताना झालेल्या या अतिवृष्टीमुळे नुकसान वाढल्याने शेतकरी तणावात आला असून शेतातून वाहिलेल्या जोरदार प्रवाहाबरोबर कांदे रोप वाहून गेले आहे. मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये मालेगाव, दाभाडी, वडनेर, करंजगव्हाण, कौळाने, सौंदाणे, सायने, अजंग, जळगाव, निंबायती, निमगाव या महसूल मंडळात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यात चारा भिजल्याने जनावरांना चारा कुठून आणायचा? दिवाळी कशी करायची? अशी चिंता आता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. यंदा पाऊसपाणी चांगला असल्याने शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे घेऊन रोपवाटिका तयार केल्या होत्या. ज्याचे आता नुकसान झाले आहे.

Agro News | दसऱ्याच्या खरेदीत साखरेला अपेक्षेपेक्षा कमी दर; दिवाळीत दर वाढण्याची शक्यता

शेतकऱ्यांवर दुबार रोप निर्मितीची वेळ

ज्यामुळे लागवडीवर मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांवर दुबार रोपनिर्मितीची वेळ आली आहे. त्यातच बियाणांच्या तुटवड्याचेही मोठे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. सटाणा तालुक्यात मोसम व करंजाडी या दोन्ही खोऱ्यात सर्वाधिक नुकसान झाले असून पिंगळवाडे येथील शेतकरी अरुण भामरे यांच्या शेतात पाण्याचा जोरदार प्रवाह शिरल्याने डाळिंबाच्या लागवडीवरील भर लावलेली माती वाहून गेली असून जमातीतील खोलवरील मुळ्या उघड्या पडल्या आहेत. टाकलेली भर, खते, सेंद्रिय आच्छादन व शेती साहित्य वाहून गेले असून पाईपलाईन उघडी पडली आहे. त्यात द्राक्ष उत्पादकांची धाकधूक वाढली असून कसमादे भागात पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादन घेतले जाते. या भागात माल काढणीसाठी येत आहे. तर काही भागात द्राक्ष माल पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जोरदार पडलेल्या द्राक्ष मालाला तडे जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली असून सध्यातरी नुकसान दिसून आलेले नाही. (Agro News)