Nashik Rain | अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात वातावरणात अनेक बदल घडत असून डिसेंबर अखेरीस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यासह राज्यातील वातावरण काहीसे ढगाळ आणि धुकेयुक्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाने पिकांना झोडपलं असून तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून त्याचबरोबर सुरगाणा तालुक्यातील काही भागात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या पश्चिम भागात काल सांयकाळी अवकाळी पावसाची दमदार बॅटिंग सुरू होती यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे. दिंडोरी तालुक्यातील ननाशी परिसरात अर्धा तास मुसळधार अवकाळी बरसली तर या झालेल्या अवकाळीमुळे तालुक्यातील रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होऊ शकतो. मात्र भात नागली, वरई, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे.
Nashik Rain | शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात
राज्यात यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाला त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, द्राक्ष, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्हयातील मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही तोच पुन्हा आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे. मागील अवकाळी पावसाचा नुकसानीतून शेतकरी उभा राहत असताना आता झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अवकाळीने कहर केल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीच्या मदतीची आस असून अजूनही मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. यातच आता पुन्हा अव्कालीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार? तसेच मदत कधी दिली जाणार यात शंकाच असल्याचं तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच मत आहे.