लेखक – कुबेर जाधव | शब्द थोडे कठोर आहेत पण ते व्यक्त करणे गरजेचे आहे. परवा पेपरात व समाज माध्यमातून बातमी वाचण्यात आली की, नामपूर बाजार समितीत एका शेतकऱ्यावर हमाल मापारी यांनी गुन्हा दाखल केला आणि काल परवा सटाणा बाजार समितीत शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांना अरेरावी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. हे शेकडो शेतकरी, व्यापारी, काही बाजार समितीवर आजी माजी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घडलंय. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना शिविगाळ करणं, अंगावर धावून जाणं हे कितपत योग्य आहे..? या कृत्याच कोणीही समर्थन करणार नाही. झालेला प्रकार हा अतिशय चीड आणनारा आहे. (Satana)
ज्यांच्या जिवावर आपली रोजीरोटी सुरू आहे. त्यांच्यावरच उलटुन संघटीत शक्तीच्या जोरावर त्यांच्या अंगावर धावून जाणं बरोबर नसून, शेतकरी जर संघटीत होऊन जाब विचारायला आले. तर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी कोण घेणार आहे..? ज्या लोकांना आजपर्यंत आर्थिक ताकद देत शेतकऱ्यांनी पोसले. त्यांनीच शेतकऱ्यांना आणि शेतकरी प्रतिनिधींना शिव्या घालणे म्हणजे ज्याच्या ताटात आपण जेवलो त्याच ताटात माती कालवून उतराही होण्यासारखे आहे.
Budget 2024 | 1.52 लाख कोटींपैकी कांदा उत्पादकांसाठी काहीच नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
माझी हमाल मापारी व्यापारी बांधवांना विनंती आहे की, यापुढे असा प्रकार घडता कामा नये. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्याठिकाणी केशव सुर्यवंशी हे हजर होते. एखाद्या शेतकरी पदाधिकारी प्रतिनिधीला शिव्या देणे म्हणजे त्या तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गाला शिव्या देणे असा होतो आणि एखाद्या शेतकऱ्याला समज न देता खोट्या केसेस दाखल करणे म्हणजेच संपूर्ण शेतकऱ्यांचा अपमान होय. (Satana)
ज्या हमाल मापाऱ्यांनी हे कृत्य केले त्यांनी हे विसरू नये की, “शेतकऱ्यांच्या जिवावरच आपण तेथे पोट भरतो”. एक वेळ अशी होती की, पाच कीलोचे माप होते मोजताना शेवटी पाच किलोच्या आत जर कुठलाही शेतमाल आला तर तो शेतकऱ्याला वापस घेवून जावा लागत असे, भुईमुग शेंगा, गहू, हरभरा कोणताही शेतमाल असेल पण आमच्या बळीराजाने तो कधी घरी परत आणला नाही. तर तो हमाल, मापाऱ्यांना राजीखुशीने दिला असेल. घेवून जा तुझे लेकरंबाळ खातील. आज त्याचीच लेकरं आमच्यावर उलटली. मोठ मन करून यांना वरून पगारा व्यतिरिक्त चहा पाण्याला दोन पैसेही दिले जातात.
बळीराजाने यांना भरभरून दिलं. अलिकडचीच गोष्ट घ्याना कांदा २५ आणि ३५ रुपये क्विंटलने शेतकऱ्यांनी विकला. एका ट्रॉलीचे ७५० रुपये मिळाले. तरी शेतकऱ्यांनी हमाली मापाऱ्यांचे ३५० रुपये काढून दिले आणि खिशातून भाडे दिले. आमच्या चुली पेटो न पेटो पण आम्ही तुमच्या चुली विझू दिल्या नाहीत. आम्हाला नफा मिळो न मिळो आम्ही तुमचा पगार कधी कमी केला नाही. गेल्या वीस वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन होत आहे. हायड्रॉलिक ट्रॉलीने आमची वाहन खाली होत आहेत. पण तरी आम्ही ब्र शब्दही काढला नाही. परंतु असे निंदनीय प्रकार जर घडत असतील. तर त्याचा विचार आम्हाला नक्कीच करावा लागेल. शेतकरी प्रतिनिधींनी घाबरून जाऊ नये. संपूर्ण शेतकरीवर्ग तुमच्या पाठीशी उभा राहिल.
-कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक)