Nilesh Lanke Protest | कांदा, दूध दर, कर्जमाफीसाठी खासदार लंकेंचं आंदोलन


अहमदनगर :  गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या धोरणांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा निर्यात बंदी आणि त्यानंतर वाढीव निर्यात शुल्क यामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. तर, शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन किंवा दुग्धव्यवसायाकडे पहिले जाते. मात्र, दूधलाही भाव नसल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. 

दरम्यान, कांदा (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा. या मागणीसाठी अहमदनगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. अहमदनगर मनपा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गाई आणि म्हशी, बैलगाड्या घेऊन गळ्यात कांद्याच्या माळा घालून निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. (Nilesh Lanke Protest)

Farmer Protest | सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांना पहिली ऑफर

५ रुपये अनुदान देऊन सरकार भीक देतंय

निलेश लंके यांचे हे आंदोलन मागील चार तासापासून सुरू आहे. मात्र, तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने निलेश लंके आक्रमक झाले.  आमचे निवेदन घेण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर यावे. नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत जाण्याचा  इशारा निलेश लंके यांनी प्रशासनाला दिला. “सरकार ५ रुपये अनुदान देऊन आम्हाला भीक देत असून, आम्हाला भीक नाही आमच्या हक्काचं द्या” अशी मागणीही यावेळी खासदार निलेश लंके यांनी केली. तसेच नीलेश लंके यांनी दूधाला ४० रुपये दर मिळावा, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, आणि कांदा व इतर शेतमालाला योग्य हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. (Nilesh Lanke Protest)

Nilesh Lanke Protest | मोर्चा अडवणाऱ्या पोलिसांना वाटले दूध 

निलेश लंके यांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असता, त्यांनी बैलगाडीसह कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी कार्यालयात जाण्यापासून त्यांचा मोर्चा अडवला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच आंदोलकांनी बैलगाडी सोडली आणि लंकेंनी तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटले.

Farmer Protest | शेतकरी आणि मोदी सरकारमधील पेच का सुटत नाही?

शेतकरी आर्थिक संकटात

दरम्यान, निलेश लंके यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “योग्य भाव न मिळाल्यामुळे राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी हे आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षभरापासून सातत्याने दूधाचे भाव कोसळत आहेत. त्यामुळे दुधाला किमान ४० रुपये इतका भाव देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

सध्या दूधाला कवडीमोल भाव मिळत असून, यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अनुदानासाठीच्या जाचक अटी आणि शर्तीमुळे शेतकरी त्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत. केंद्र सरकारने नुकतीच दहा हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलयाने आणि ही आयात करमुक्त असल्याने याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.