सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्व भागातील निंबोळा, महालपाटणे, मेशी, डोंगरगाव, रणादेवपाडे, देवपूरपाडे, खालप, वासोळ आदी तर पश्चिम भागातील खर्डे परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला व नुकताच वावरात काढून ठेवलेला शेतमाल पाण्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंदा सुरुवातीपासूनच पावसाळा चांगला असल्याने या भागात मका, कांदा, तूर ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली गेली. सध्या मका कापणीची लगबग सुरू होती. मजुराअभावी घरच्या घरी मका चारा आवरण्याचा प्रयत्न चालू होता परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मकाचारा व बिट्टी भिजून गेली आहे.
अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला
हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेल्याने शेतकरी पुरता हतबल झालेला आहे. या दिवसात परिसरात उन्हाळ कांद्यासाठी रोप तयार करण्याचे काम सुरू असते, परंतु ठराविक अंतराने येणाऱ्या पावसामुळे यावर्षी कांदा रोप जगवणे कठीण होऊन गेले आहे. घरात होते नव्हते तेव्हढे बियाणे मातीत टाकून शेतकरी एका अर्थाने जुगार खेळला खरा, परंतु या जुगारात नियतीने शेतकऱ्याचे स्वप्न धुळीस मिळवल्याने आज गावागावात शेतकरीवर्ग नाराज व हताश होऊन पुन्हा एकदा जुगार खेळण्यासाठी कांदा बियाणे शोधण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
Deola | देवळ्यात चक्क कांद्याने भरलेले ट्रॅक्टर लंपास; नागरिकांमध्ये खळबळ
आर्थिक मदत देऊन संकटातून बाहेर काढण्याची शेतकऱ्यांची मागणी
दुकानातून आणलेल सर्व बियाणं माती टाकले गेल्याने आता शेतकऱ्यांकडे कांदा रोपासाठी बियाणे शिल्लक नाही किंवा बाजारातही बियाण्याचा तुटवडा असल्याने कांदा बियाण्याअभावी हंगाम वाया जाण्याची भीती आहे. याची दखल घेऊन शासनाने तात्काळ सरसकट आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
“रात्रभर जोराचा पाऊस सुरू असल्याने परिसरातील मका, कांदा, कांदा रोप, तुर, मिरची, टमाटे अशी पिके उध्वस्त झालेली आहेत. मी स्वतः 20 किलो कांद्याचे रोप विकत घेऊन महिनाभरापूर्वी जमिनीत टाकले होते. परंतु आजच्या पावसामुळे ते पूर्णपणे खराब झालेले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. तरी शासनाने सरसकट आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याला या अस्मानी संकटातून बाहेर काढावे ही विनंती.” – अभिमन आहिरे प्रगतिशील शेतकरी, देवपूरपाडे ता. देवळा